Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

कोरोना विषाणू काय आहे ?

कोरोना विषाणू हे विषाणूंच्या मोठ्या समूहातील एक प्रकारचे विषाणू असून त्यांचा संसर्ग मानवाप्रमाणे ऊंट, गाई-गुरे, मांजरे आणि वटवाघुळे अशा अनेक पशु-पक्ष्यांच्या प्रजातींनाही होऊ शकतो. कोरोना विषाणूंचा संसर्ग हा प्राण्यांकडून मानवांना, तसेच एका मानवाकडून दुसर्‍या मानवास अशा प्रकारे होऊ शकतो आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीस सर्दीपासून ते घातक न्युमोनिया पर्यंत श्वसनसंस्थेचे संक्रामक आजार होऊ शकतात. सध्या जगाभरात धुमाकूळ घालत असलेल्या नोवेल कोरोना विषाणूचा उद्रेक चीन देशाच्या हुबेई प्रॉव्हिन्स मधील वुहान मध्ये झाला असून संसर्गाचे मूळ कारण तेथील मोठा सागरी अन्न आणि जिवंत प्राण्यांचा बाजार हे आहे आणि तेथे प्राण्यांकडून माणसांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन हा संसर्ग पुढे एका माणसाकडून दुसर्‍या माणसाकडे फैलावत गेला असे सांगितले जाते.

Severe Acute Respiratory Syndrome Coronavirus -2 (SARS-CoV-2)(कोरोना विषाणु - २ जन्य गंभीर तीव्र स्वरूपाचा श्वसनसंस्थासंबंधित लक्षणांचा समुच्चय) हे नाव २०१९ मध्ये उद्रेक झालेल्या नोवेल कोरोना विषाणू संसर्गास देण्यात आले आहे. COVID-19 (Coronavirus Disease 2019) हे नाव या विषाणूच्या संसर्गामुळे होणार्‍या आजारास देण्यात आले आहे. सार्स (SARS) आणि मर्स (MERS) यांसारखे यापूर्वीच्या काळातील साथीचे आजार होण्यास कोरोना विषाणू समूहातील विषाणूच कारणीभूत होते.

जगातील १०० हून अधिक देशांमध्ये (अचूक संख्या द्यायची झाली, तर १२५ देशांमध्ये) फैलावलेल्या COVID-19 (Coronavirus Disease 2019) ला विश्व आरोग्य संघटनेने ११ मार्च २०२० रोजी जागतिक महामारी घोषित केले.

कोरोना विषाणू (व्हायरस) कसा फैलावतो (पसरतो)?

एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीस (थेट संपर्काद्वारे) - नोवेल कोरोना विषाणू हा मुख्यत: एका माणसाकडून दुसर्‍या माणसात संक्रमित होतो. संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्या-थुंकण्याद्वारे श्वसनसंस्थेतून जे थेंब नाकातोंडातून बाहेर पडून जवळ असलेल्या (१ मीटर च्या आत) व्यक्तीच्या नाका-तोंडावर पडतात, तेव्हा या विषाणूचे संक्रमण होऊ शकते.

दूषित पृष्ठभागाशी आलेल्या संपकाद्वारे - संक्रमित व्यक्तीच्या नाका-तोंडातून उडलेले थेंब जवळपासच्या टेबलावर, दरवाजाच्या कडी-कुलुपावर, जिन्याच्या बाजूला हाताला आधार म्हणून लावलेल्या दांड्यावर किंवा अशा प्रकारच्या अन्य वस्तूंवर उडतात. या पृष्ठभागांवर हे विषाणू अनेक तासांपर्यंत तग धरून राहू शकतात आणि जेव्हा कुणी व्यक्ती या वस्तूंना स्पर्श करते आणि त्यानंतर त्या हाताने स्वत:च्या डोळे, नाक व तोंड यांना स्पर्श करते, तेव्हा त्यांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.

विषाणू संसर्ग होण्यापासून ते लक्षणे प्रकट होईपर्यंतचा काळ हा साधारणपणे ते १४ दिवसांचा असतो. या काळात संक्रमित व्यक्तीकडून लक्षणे व्यक्त होताही इतरांना विषाणूंचे संक्रमण केले जाऊ शकते, ही शक्यता सध्याच्या काळी नाकारता येत नाही. COVID-19 च्या संसर्गाचा सर्वांत जास्त धोका कोणाला आहे?
  • कोरोना विषाणूंचा फैलाव होत असलेल्या ठिकाणी राहणारे, त्या ठिकाणी जाणारे अशा व्यक्तींना संक्रमणाचा धोका जास्त असतो.
  • आरोग्यक्षेत्रात कार्य करणारे आणि ज्या व्यक्तींचा त्यांच्या नोकरी-व्यवसायामुळे रोज अनेकांशी संपर्क येतो (उदा. बस कंडक्टर, टॅक्सी चालक, शिक्षक, विद्यार्थी) असे सर्वजण.
  • ८०% रुग्णांमध्ये, १० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांमध्ये आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये COVID-19 च्या संसर्गाची तीव्रता कमी असते.
  • १७% रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता अधिक असू शकते. संक्रमित सहांपैकी एका व्यक्तीस रुग्णालयात भरती करण्याची गरज असते.
  • या विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका असणारे पुढीलप्रमाणे आहेत -
    • वयोवृद्ध
    • जे अगोदरपासूनच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, फुफ्फुसांचे विकार, मूत्रपिंड विकार (किडनी फेल्युअर), दमा यांनी ग्रस्त आहेत असे रुग्ण.
    • गरोदर स्त्रिया
    • लहान बाळं
    • ज्यांना कर्करोगावरील उपचार म्हंणून केमोथेरपी / रेडियोथेरपी सुरू आहे असे रुग्ण.
  कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे कोणती आहेत?
  • काही जणांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला असूनही त्याची लक्षणे दिसून येत नाहीत
  • कोरोना विषाणू संक्रमित ६ जणांपैकी एका व्यक्तीमध्ये (फक्त १७%) संक्रमण गंभीर स्वरूप धारण करून ही लक्षणे प्रकट करू शकते -
  1. श्वास घेण्यास त्रास होणे (Respiratory distress)
  2. प्रचंड ताप येणे
  3. छातीत सतत दुखणे किंवा छातीवर दबाव वाटणे
  4. खोकल्यावर कफासोबत रक्त येणे
  5. नखे आणि ओठ निळे पडणे
  6. रक्तदाब खाली घसरणे
गंभीर स्वरूपाची लक्षणे केवळ १६ ते १७ % केसेसमध्ये, विशेषत: वयोवृद्ध, तसेच जे अगोदरपासूनच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, फुफ्फुसांचे विकार, मूत्रपिंड विकार (किडनी फेल्युअर), दमा यांनी ग्रस्त आहेत अशांमध्येच दिसून येतात. कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे दिसू लागताच काय करावे? COVID-19 वर काही उपचार उपलब्ध आहेत का? 
  • सध्या तरी कोरोना विषाणू संसर्गावर लस किंवा प्रतिविषाणू (अ‍ॅंटिव्हायरल) औषध उपलब्ध नाही आणि यावर उपचार म्हणून प्रतिजैविके (अ‍ॅंटिबायोटिक्स) उपयुक्त नाहीत. पण तरीही घाबरून जाण्याची गरज नाही.
  • तुम्हाला बरे वाटत नसेल आणि ताप, घसादुखी वगैरे लक्षणांमुळे मनात संसर्गाची शंका येत असेल, तर सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नका!लगेच पुढील वेबसाईट (https://images.mohfw.gov.in/) जी भारत सरकारची अधिकृत साईट आहे, त्यावर दिलेल्या सूचना वाचून त्याचे पालन करावे (https://images.mohfw.gov.in/FINAL_14_03_2020_Hindi.pdf). या व्यतिरिक्त २४ x हेल्पलाईन नंबर (+९१-११-२३९७८०४६) वर संपर्क करावा
COVID-19 पासून स्वत:ला कसे सुरक्षित राखाल? (कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय) रोग-प्रतिबंध हा नेहमीच रोग-उपचाराहून श्रेष्ठ असतो. नोवेल कोरोना विषाणू वर सध्या तरी कुठल्याही प्रकारचे औषध-उपचार किंवा लस उपलब्ध नसल्याने प्रतिबन्ध हाच स्वत: सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे - स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी घ्यावयाची दक्षता खालीलप्रमाणे आहे -
  • जरी तुमचे हाथ स्वच्छ दिसत असले, तरी वारंवार तुमचे हाथ धुवा.
  • साबण आणि पाणी यांनी कमीत कमी २० सेकंदांपर्यंत हाताच्या पुढची-मागची बाजू, बोटांमधील बेचक्या अशा सर्व भागांचा समावेश करून व्यवस्थितपणे तुमचे हात धुवा, विशेषत: शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर, नाक पुसल्यानंतर, गर्दीच्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर किंवा कुणाशी हस्तांदोलन केल्यानंतर. (अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्स पेक्षा साबण हा अधिक प्रभावी आहे कारण तो विषाणूचे कवच भेदून टाकतो.)
  • खालील निर्दिष्ट केल्याप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी हाताचा स्पर्श करून आल्यास हाथ व्यवस्थित धुवा.
    • उद्वाहनाची (लिफ्टची) बटणे
    • दरवाजाच्या कड्या, कुलपे
    • जिन्याच्या बाजूला हाताला आधार म्हणून लावलेला दांडा
    • टेबलचा पृष्ठभाग इत्यादि.
  • जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल, तर हात स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्स (६०% अल्कोहोल) वापरू शकता.
  • खोकताना किंवा शिंकताना तुमचे तोंड आणि नाक तुमच्या दुमडलेल्या कोपराने किंवा रुमालाने अथवा टिश्यु पेपरने झाका. वापरानंतर टिश्यु पेपर ताबडतोब बंद कचराकुंडीत टाका.
  • जर तुम्हाला ताप आला असून घसा खवखवत असून खोकला झाला असेल आणि तुम्ही संसर्गाचा अत्यधिक धोका असलेल्या गर्दीच्या ठिकाणी असाल, तर तुम्ही मास्क वापरा.
  • ज्यांच्या पृष्ठभागास वारंवार स्पर्श केला जातो, अशा घरातील टेबल, दरवाजाच्या कड्या, कुलपे, पंख्याची, दिव्याची बटणे, मोबाईल फोन इत्यादि गोष्टींसह अख्ख्या घरासच कमीत कमी ७०% अल्कोहोल बेस्ड डिसइंफेक्टंट्सचा वापर करून निर्जंतुक ठेवा.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
  • गरज नसताना स्वत:च्या डोळ्यांस, तोंडास आणि नाकास हात लावू नका.
  • गर्दी असलेल्या, तसेच जेथे शुद्ध हवा खेळती राहत नाही अशा ठिकाणी जाणे टाळा, कारण अशा ठिकाणी जर संक्रमित व्यक्ती उपस्थित असतील, तर संसर्ग होण्याची शक्यता बळावते.
  • खोकत किंवा शिंकत असलेल्या व्यक्तीपासून मीटर अंतर राखा, त्याच्या जवळ जाणे टाळा.
  • तुम्ही जर संसर्गप्रवण (संसर्ग होण्याची शक्यता अधिक असणार्या) विभागात रहात असाल, तर शक्यतो घरीच रहा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा.
  • संसर्गप्रवण स्थानी (शहरे/देश) जाणे अत्यावश्यक असल्यासच जा.
 

महत्त्वाची सूचना:

अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्स पेक्षा साबण / लिक्विड सोप आणि पाणी यांनी हात धुणे हा कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबन्धात्मक प्रभावी उपाय आहे:

  • आधुनिक संशोधनानुसार साबणाचे रेणु (मॉलिक्युल्स) फॅट्स आणि प्रोटिन यांनी बनलेल्या, कोरोना विषाणुच्या कवचात स्वत: प्रवेश करतात. विषाणूला धारण करणारा रासायनिक बन्ध (केमिकल बॉण्ड) विशेष मजबूत नसल्याने साबणाच्या रेणुंसाठी विषाणूचे कवच भेदणे कठीण नसते. साबणाचा रेणु विषाणूला वेगळा काढतो, विघटित करतो आणि पाण्यात विरघळणारा बनवतो, जो साबणाच्या पाण्यासह वाहून नेला जातो.
  • साबणासह वापरले जाणारे पाणी त्वचेच्या रंध्रांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढते आणि तेथे दडलेल्या विषाणूंचा सफाया साबण करतो.
  • विषाणूंचा सफाया करण्यासाठी सॅनिटायझर्स मध्ये अल्कोहोलचे प्रमाण ६०% पेक्षा जास्त असावे लागते, जे हात धुण्यासाठी वापरल्या जाणार्या अनेक सॅनिटायझर्स मध्ये असेलच असे नाही.
  • अधिक प्रमाणात अल्कोहोल असणारे सॅनिटायझर्स संवेदनशील त्वचेचे नुकसान करू शकतात.
  • सॅनिटायझर्स सोबत पाणी वापरले जात नसल्याने त्वचेच्या रंध्रांमधील मळाखाली दडलेल्या विषाणूंना हटवण्यासाठी सॅनिटायझर्स प्रभावी नाहीत.
  • COVID-19 च्या १२ मार्च २०२० रोजीच्या स्थितिचे संख्यात्मक विवरण -

    • जगभरात नोवेल कोरोना विषाणूंनी संक्रमित झालेल्या व्यक्ती - १,२९,१६७
    • विषाणू संक्रमण बाधित देश - १२५
    • आजारातून बरे झालेले लोक - ६८,६५६
    • ॅक्टिव्ह केसेसची संख्या - ५५,७६२
    • मरण पावलेल्यांची संख्या - ४,७४९
    • भारतातील केसेसची संख्या - ७३

    कोरोना विषाणूंचा संसर्ग आज अख्ख्या जगात झपाट्याने पसरत आहे. इटली, चीन यांसारख्या देशांना लॉक डाऊन परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि अनेक युरोपीय देशही याच वाटेने प्रवास करत आहेत. विश्व आरोग्य संघटनेने COVID-19 ला जागतिक महामारी घोषित केले आहे.

    जगभरात घबराट पसरली आहे. पण घाबरून प्रश्न सुटणार नाही. आम्ही स्वत:ला या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सक्षम करायला हवे. आपण जर काळजी घेतली आणि प्रतिबन्धात्मक उपायांचा अचूकपणे अवलंब केला, तर आपण स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो. चला तर मग, COVID-19 चा मुकाबला करण्यासाठी सिद्ध होऊया.

    The Helpline Number for corona-virus: +91-11-23978046

    The Helpline Email ID for corona-virus: [email protected]

    Coronavirus helpline number Maharashtra:  Landline: 020-26127394, BMC (Brihanmumbai Municipal Corporation) Helpline no: 1916

    FOR LATEST UPDATES ON COVID-19 PLEASE VISIT: https://images.mohfw.gov.in/  

    REFERENCES:

       
[maxbutton id="3" url="https://images.healthonics.healthcare/coronavirus-disease-dont-worry-will-fight-together/" ] [maxbutton id="4" url="https://images.healthonics.healthcare/coronavirus-disease-dont-worry-will-fight-together-hindi/" text="हिन्दी" ]