
पिझ्झाच्या भाजीचे सारण
बिनतेलाचे पिझ्झाच्या भाजीचे सारण
साहित्य
• मुख्यसाहित्य:
१. टोमॅटो – ३ (लहान)
२. कांदा – २
३. भोपळी मिरची – २
४. मक्याचे दाणे – १०० ग्रॅम (एक वाडगा)
५. घरगुती बनवलेले पनीर – १०० ग्रॅम
(आपण आपल्या आवडीप्रामाणे ही भाज्या निवडू शकता)
६. काश्मिरी लाल तिखट – १/२ छोटा चमचा
७. मीठ – चवीनुसार
८. चाट मसाला – १/४ छोटा चमचा
९. धणे-जिरे पूड – १/४ छोटा चमचा
१०. डेक्स्ट्रोज साखर – १/२ चमचा (जर टोमॅटो आंबट असेल तर)
११. कोथिंबीर – सजावटीसाठी
पध्दत :
१. टोमॅटो, कांदा व भोपळी मिरची बारीक चिरून घ्यावी.
२. एका भांड्यात मक्याचे दाणे उकडून घ्यावे.
३. पनीरचे लहान चौकोनी तुकडे करुन घ्यावे.
४. गॅस / स्टोव्ह किंवा हॉटप्लेट वर आवड व उपलब्धतेनुसार एक कढई (सॉस पॅन) तापत ठेवावी व नंतर त्यात चिरलेला कांदा घालावा.
५. गुलाबी-तपकिरी रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यावा. कांदा मऊ करण्यासाठी त्यात थोडे मीठ घालावे.
६. जवळजवळ २ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
७. त्यात २ मिनिटांनंतर चिरलेला टोमॅटो घालावा.
८. सर्व नीट परतून घ्यावे व साधारण ५ मिनिटे शिजवावे.
९. आता बारीक चिरलेली भोपळी मिरची त्यात घालावी व सर्व पुन्हा नीट हलवून घ्यावे व झाकून ठेवावे.
१०. नंतर त्यात उकडलेल्या मक्याचे दाणे घालून सर्व नीट मिसळावे.
११. आता त्यात काश्मिरी लाल तिखट, धणे-जिरे पूड, मीठ, डेक्स्ट्रोज घालून सर्व व्यवस्थित हलवावे.
१२. शेवटी या मिश्रणात पनीर घालून त्यावर चाट मसाला भूरभूरावा. सर्वकाही चांगले मिसळून साधारणपणे २ मिनिटे झाकून ठेवावे.
१३. यावर चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम वाढावे.
१४. आपले बिनतेलाचे पिझ्झाच्या भाजीचे सारण तयार झाले…
आपण हे भाजीचे सारण फ्रँकी किंवा पिझ्झा बेसवर किंवा सँडविचमध्ये देखील वापरू शकतो. भाताबरोबर देखील हे खाल्ले जाऊ शकते. फक्त मुलांसाठीच नव्हे तर प्रौढांच्या टिफिनसाठीसुद्धा हा फारच चांगला व पोषक पर्याय आहे. ह्याचा आस्वाद घ्या… कारण हे पूर्णपणे तेलाशिवाय बनवलेले आहे व त्यात कॅलरीजही कमी आहेत.