17 Apr 2018

कॉलीफ्लॉवर राईस

 

तुम्ही कधी विचार केला आहात का, फ्लॉवर भाता सारखा किंवा भात म्हणून खाऊ शकता? हो हे खरे आहे! ह्या कॉलीफ्लॉवर राईस मध्ये भाताचा एकही कण नाही आहे, अख्खा फ्लॉवर तांदुळाच्या आकाराएवढा बारीक दळून (ग्राइंड ) वापरण्यात येतो. हा तंतोतंत भात प्रमाणे दिसतो आणि भाताप्रमाणेच जेवणात मावून जातो. ह्या मध्ये कॅलरी पण अतिशय कमी आहेत, ज्यामुळे हा हेल्थ कॉन्शिअस लोकांसाठी जेवणामध्ये भाताला उत्तम पर्याय ठरू शकतो. हा अतिशय चविष्ट पण आहे आणि ह्या पासून आपण बिर्याणी व पुलाव सुद्धा बनवू शकतो. चला तर हा अदभूत पदार्थ बनवूयात.

 

कॉलीफ्लॉवर राईस

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:

       १. फ्लॉवर (फुलकोबी) – १ मोठ्या आकाराचा
       २. कांदा – २ नग (मध्यम आकाराचे)
       ३. संडे मसाला – १ टी स्पून किंवा चवीप्रमाणे
       ४. कोथिंबीर – १ छोटी वाटी
       ५. मीठ – चवीप्रमाणे
       ६. पाणी – दीड ग्लास

 

 

पध्दत :

१. एक मोठा फ्लॉवर (फुलकोबी) मीठ आणि हळद मिक्स केलेल्या कोमट पाण्यामध्ये २० मिनिटांसाठी भिजवून ठेवावा जेणेकरून त्यावरील कीटकनाशके निघून जातील.

२. वीस मिनिटांनंतर तो फ्लॉवर स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्यावा.

३. फ्लॉवरच्या त्यानंतर छोट्या छोट्या पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात.

४. ह्यानंतर मिक्सर किंवा फूड प्रोसेसर वापरून ह्या फ्लॉवरचा पाकळ्या भाताच्या शीता एवढ्या बारीक करून घ्याव्यात.

५. आता साहित्यात दिल्या प्रमाणे दोन मध्यम आकाराचे कांदे घ्या व त्याचे बारीक तुकडे करा.

६. हॉटप्लेट/ गॅस शेगडी /स्टोव्ह वर एक कढई गरम करत ठेवा आणि त्यामध्ये हे बारीक कापलेले कांदे घाला आणि साधारण गुलाबी रंग येईपर्यंत नीट परतून घ्या.

७. ह्या परतलेल्या कांद्यांमध्ये आता थोडे मीठ आणि पाणी मिक्स करा जेणे करून ते लवकर मऊ होतील.

८. आता बारीक करून घेतलेला फ्लॉवर ह्या मध्ये घालून नीट मिक्स करून घ्या.

९. नंतर ह्या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ, संडे मसाला घालावा, मग उरलेले पाणी आणि थोडीशी कोथिंबीर ह्यात घालून पुन्हा सर्व मिश्रण नीट मिक्स करून घ्या.

१०. हे झाल्यावर कढईवर झाकण ठेवा आणि फ्लॉवर १५ मिनिटांसाठी नीट शिजू द्या.

११. आता तुमचा तेल विरहित कमी कॅलरीयुक्त कॉलीफ्लॉवर राईस तया झाला जो कि भाताला उत्तम पर्याय ठरू शकतो.

१२. उरलेली कोथिंबीर सजावटी साठी वापरा आणि ह्या गरमागरम कॉलीफ्लॉवर राईस चा आनंद लुटा.

 

ह्या मध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही बदल करू शकता, जसे:

१. हा कॉलीफ्लॉवर राईस तुम्ही नेहमीच्या भाता सारखा वरण किंवा आमटी बरोबर खाऊ शकता.

किंवा

२. ह्या मध्ये चिरलेली कांद्याची पात आणि भाज्या मिक्स करून त्याचा पुलाव/फ्राईड राईस बनवू शकता.

किंवा

३. पातळ भाजी बनवून ह्यामध्ये मिक्स करू शकता आणि बिर्याणी म्हणून खाऊ शकता.

 

[button link=”https://www.healthonics.healthcare/cauliflower-rice-english/” size=”medium” bgcolor=”#359af2″ variation=”blue” textcolor=”#ffffff” target=”_blank” align=”center”]Recipe in English[/button]

One Comment

  • Jyotsna Shyamkant Matondkar April 17, 2018

    Very impressive! Beyond imagination but yet very nice receipe. A must try one

    Reply

Leave a Reply