01 Aug 2018

चिकन फ्रँकी

 

कमी कॅलरीयुक्त चिकन फ्रँकी

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. भाज्या : तुमच्या आवडीप्रमाणे   ह्या पाककृतींमध्ये वापरलेल्या भाज्या
२. कोबी- ५० ग्रॅम    
३. टोमॅटो- १
४. सिमला मिरची- १    
५. बेबी कॉर्न – ३   
६. गाजर- १    
७. कांदे – २ ( एक बारीक चिरून आणि दुसऱ्याच्या पातळ चकत्या करून )    
८. बोनलेस चिकन ब्रेस्ट – २५० ग्रॅम    
९. ज्वारीचे पीठ – २०० ग्रॅम

सूचना: चिकन बरोबर भाज्यांचा वापर कॅलरींचे प्रमाण कमी करण्या साठी केला गेलेला आहे.   

चिकन मॅरिनेशनसाठी मसाले :
१. मीठ- चवीप्रमाणे
२. हिरवे वाटण- १/२ टी स्पून
३. संडे मसाला – १/४ टी स्पून
४. धने-जिरे पूड – १/४ टी स्पून
५. लिंबू – अर्धे
६. हळद – १/४ टी स्पून

फ्रँकी मध्ये भरण्यासाठी:
१. मीठ – चवीप्रमाणे
२. हिरवे वाटण- १ टी स्पून
३. चाट मसाला- १ टी स्पून
४. काश्मिरी लाल मिरची पूड (रंग येण्यासाठी) – १ टी स्पून
५. तेल- ब्रशिंगसाठी

फ्रँकी टॉपींगस ( गरजेप्रमाणे आवश्यकता असल्यास):
१. घरगुती आंबटगोड चिंचेची चटणी – १ टेबल स्पून
२. घरगुती शेझवान सॉस – १ टेबल स्पून
३. कांदा- बारीक चकत्या करून
४. कोथिंबीर – बारीक (सजावटी करिता)
५. चाट मसाला

 

पध्दत :

१. प्रथम साहित्य दिलेल्या सर्व भाज्या १५-२० मिनिटांसाठी त्यांच्या सालींसकट हळद आणि मीठ घातलेल्या कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवाव्यात. २० मिनिटांनंतर हळद आणि मीठाचे कोमट पाणी ओतून द्यावे आणि ह्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.
२. आता ह्या सर्व भाज्या नीट चिरून घ्याव्यात.
३. एका बाउलमध्ये ज्वारीचे पीठ घ्यावे आणि त्यात थोडेसे मीठ घालून थोडे थोडे पाणी घालत राहावे. असे करताना हे मिश्रण सतत नीट ढवळत राहावे जेणे करून ते डोस्याच्या पिठासारखे एकजीव होईल.
४. आता बोनलेस चिकन नीट धुवून स्वच्छ करून घ्यावे आणि ते मॅरीनेट करावे. मॅरिनेशनसाठी मीठ – १/२ टी स्पून, संडे मसाला – १/४ टी स्पून, धने-जिरे पूड- १/४ टी स्पून, हळद- १/४ टी स्पून, हिरवे वाटण- १/२ टी स्पून, लिंबाचा रस – १/२ टी स्पून चा वापर करावा.
५. हे सगळे नीट मिक्स करून ३० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यावे.
६. आता एक कुकर हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह वर गरम करत ठेवावा. नंतर ह्यामध्ये कांद्याच्या बारीक चकत्या ठेवून त्या गुलाबी आणि नरम होई पर्यंत नीट परतून घ्याव्यात. कृती जलद होण्यासाठी तुम्ही ह्यामध्ये चिमूटभर मीठ घालू शकता.
७. आता ह्यामध्ये १/४ ग्लास पाणी मिक्स करावे आणि नीट ढवळून घ्यावे.
८. कुकरची एक शिट्टी होऊ द्यावी.
९. आता हॉटप्लेट/गॅस/स्टोव्हवर एक तवा गरम करत ठेवावा. त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो आणि चिमूटभर मीठ घालून नीट परतून घ्यावे.
१०. आता ह्यामध्ये उरलेल्या सर्व भाज्या मिक्स कराव्यात आणि हे मिश्रण ५ मिनिटांसाठी पुन्हा नीट परतून घ्यावे.
११. ह्यामध्ये साहित्यामध्ये दिलेले सर्व मसाले मिक्स करावेत आणि नंतर ह्यावर झाकण ठेवून.
१० मिनिटांसाठी नीट शिजू द्यावे.
१२. गरज वाटल्यास थोडेसे पाणी मिक्स करावे.
१३. हे भाज्यांचे मिश्रण शाकाहारी जेवणासाठी मिक्स. व्हेज. फ्रँकी बनवायला पण वापरू शकतो.
१४. आता शिजवलेले चिकन भाज्यांच्या मिश्रणामध्ये मिक्स करावे आणि पुन्हा सर्व मिश्रण नीट परतून घ्यावे.
१५. हे थोडे कोरडे होईपर्यंत म्हणजे, साधारण ५ मिनिटांसाठी नीट शिजू द्यावे.
१६. आता अजून एक तवा गरम करून घ्यावा. त्याला ब्रशने एक थेम्ब तेल नीट लावून घ्यावे आणि एक डाव ज्वारीचे पीठ त्यावर डोस्याप्रमाणे पसरून घ्यावे.
१७. हे दोन्ही बाजूने नीट पालटून घ्यावे.
१८. अश्याप्रकारे डोस्यासारख्या ह्याच्या पोळ्या बनवून एका ताटामध्ये ठेवून द्याव्यात.
१९. आता एका ताटलीमध्ये एक पोळी घ्यावी आणि त्याच्या मध्यभागामध्ये चिकन आणि भाज्यांचे मिश्रण भरून घ्यावे.
२०. ह्यामध्ये तुमच्या आवडीचा सॉस, कांदा, कोथिंबीर मिक्स करावा आणि वरून चाट मसाला आणि कोथिम्बिर घालून घ्यावी.
२१. आता हि पोळी दोन्ही बाजूने दुमडून घ्यावी आणि सिल्वर फॉईल मध्ये नीट रॅप करावी.
२२. आता ह्या कमी कॅलरीयुक्त चिकन फ्रॅंकीचा आस्वाद तुमच्या आवडत्या सॉस सोबत लुटू शकता.

हि फ्रँकी एक उत्तम पर्याय ठरू शकत जसे,
१. दुपारच्या जेवणाकरिता
२. शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये टिफिनमध्ये देण्याकरता
३. पिकनिक साठी

 

[button link=”https://www.healthonics.healthcare/chicken-frankey-english/” size=”medium” bgcolor=”#359af2″ variation=”blue” textcolor=”#ffffff” target=”_blank” align=”center”]Recipe in English[/button]

Leave a Reply