15 May 2018

कमी कॅलरीयुक्त ज्वारीचा ब्रेड (ग्लुटेनफ्री)

 

आपण नेहमी जो ब्रेड खातो तो एकतर मैद्याचा बनलेला असतो किंवा गव्हापासून बनलेला असतो. मैद्यापासून बनलेला ब्रेड हा आरोग्यासाठी हानिकारक असतो आणि त्याबरोबरच त्याच्यामध्ये कॅलरीज पण भरपूर प्रमाणात असतात. गव्हापासून बनलेला ब्रेड आरोग्यासाठी हानिकारक नसेल पण त्यातसुद्धा भरपूर प्रमाणात कॅलरीज असतातच, ज्यामुळे तो वजन ज्यानं कमी करायचे आहे अश्यांसाठी योग्य पर्याय ठरू शकत नाही. गव्हामधील ग्लूटेनमुळे सुद्धा काही जणांना त्रास होण्याची शक्य असते. अश्या परिस्थितीत ज्वारीचा ब्रेड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो , पण बाजारामध्ये फक्त ज्वारीचा ब्रेड सापडणे थोडे कठीणच असते. पण काळजी करू नका, ह्यावर सुद्धा उपाय आहे! तुम्ही तुमच्यासाठी ज्वारीचा ब्रेड घरच्याघरीच बनवू शकता आणि तो पण फक्त ओव्हन किंवा साधा प्रेशर कुकर वापरून! पुढे दिलेली रेसिपी तुम्हाला हा ज्वारीचा ब्रेड कसा बनवावा ह्यासाठी मार्गदर्शन करेल जेणे करून तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये कुठलीही चिंता न करता ब्रेड चा आस्वाद घेऊ शकाल. हा ब्रेड बनवण्यासाठी फक्त १-२ थेंब तेलाची आवश्यकता आहे आणि साखरेची तर गरजच नाही, त्यामुळे ह्यात कॅलरीज पण खूपच कमी प्रमाणात आहेत.

 

कमी कॅलरीयुक्त ज्वारीचा ब्रेड (ग्लुटेनफ्री)

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:
१. ज्वारीचे पीठ – २५० ग्रॅम.
२. दही – २५० ग्रॅम.
३. दूध – २५० मिली.
४. मीठ – चवीप्रमाणे
५. इनो फ्रुट सॉल्ट – २ टी स्पून्स
६. बेकिंग सोडा – १/२ टी स्पून
७. बेकिंग पावडर – १ टी स्पून

 

पध्दत :

१. प्रथम एका बाउल मध्ये दही फेटून घ्यावे.
२. त्यानंतर ह्या मध्ये दूध मिक्स करावे.
३. मग ह्या मिश्रणामध्ये थोडे थोडे करून ज्वारीचे पीठ मिक्स करावे. असे करत असताना मिश्रण सतत ढवळत राहावे जेणेकरून पीठामध्ये गोळे तयार होणार नाहीत. असे करून ते मिश्रण घट्ट आणि एकजीव करून घ्यावे.
४. आता ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि इनो फ्रुट सॉल्ट मिक्स करावे.
५. हे घट्ट आणि एकजीव मिश्रण पुन्हा एकदा जोरजोराने ढवळून घ्यावे.
६. हे मिश्रण आंबले कि वजनाने हलके होते जेणेकरून ब्रेड नीट व्हायला मदत होते.
७. आता एक आयताकृती साचा घ्यावा आणि त्याला १ थेंब तेल सर्व बाजूने नीट लावून घ्यावे, आणि थोडेसे ज्वारीचे कोरडे पीठ ह्यावर लावून घ्यावे.
८. आता आंबवलेले घट्ट मिश्रण ह्या साच्यामध्ये भरून घ्यावे.
९. आता ओव्हन सुरु करून नीट गरम होऊ द्यावा.
१०. त्यानंतर हे मिश्रण ओव्हनमध्ये २५० अंश तापमानावर एक ते दीड तासांपर्यंत नीट भाजून (बेक करून) घ्यावे.

किंवा

११. एका कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घ्यावी
१२. त्यानंतर कुकर मध्ये एक स्टॅन्ड ठेवून कुकर हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह (उपलब्धतेनुसार) वर ५-८ मिनिटांसाठी गरम करत ठेवावा.
१३. आता कुकरमध्ये ब्रेडचे घट्ट मिश्रण भरलेला साचा ठेवावा.
१४. हे मिश्रण कुकरमध्ये १ तासासाठी नीट भाजून (बेक करून) घ्यावे.
१५. ब्रेड तयार झाला कि नाही हे पाहण्यासाठी एक टूथ पिक घ्यावी आणि ब्रेड मध्ये खुपसावी आणि बाहेर काढावी.
१६. ती जर का स्वच्छ बाहेर आली तर ब्रेड नीट तयार झाला असे समजावे.
१७. आता हा ब्रेड १५-२० मिनिटांसाठी नीट थंड होऊ द्यावा.
१८. नंतर सुरीचा वापरकरून ह्याच्या कडा मोकळ्या करून घ्याव्यात आणि साचा एका ट्रे मध्ये उपडा करावा. हा झाला तुमचा कमी कॅलरीयुक्त ज्वारीचा ब्रेड तयार.

ह्या ब्रेडचा उपयॊग करून तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी बनवून करू शकता जसे:
· सँडविचेस (सलाड आणि आवडता सॉस वापरून)
· गार्लिक ब्रेड (ब्रेड वर थोडे मीठ आणि लसणाची पेस्ट लावून भाजावा)
· कुरकुरीत टोस्ट ज्याचा आस्वाद तुम्ही चहा/कॉफी सोबत घेऊ शकता. किंवा,
· पाव-भाजी मध्ये पावाला पर्याय म्हणून

 

[button link=”https://www.healthonics.healthcare/jowar-bread-english/” size=”medium” bgcolor=”#359af2″ variation=”blue” textcolor=”#ffffff” target=”_blank” align=”center”]Recipe in English[/button]

Leave a Reply