Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

  कधी तरी विचार केला आहात का, की दुधीभोपळा, लालभोपळा, कोबी सारख्या भाज्या एकत्र खाणे हे सुद्धा एखाद्या मेजवानी सारखेच असेल? होय, जर तुम्ही ह्या पासून मिक्स भाज्यांचे मुटके बनवलेत तर ते एखाद्या मेजवानी सारखेच असेल. हे मुटके नुसतेच विष्ट आणि चटकदारच नाही तर पौष्टिक सुद्धा आहेत. तुमच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एकच विष्ट व कमी कॅलोरी युक्त असा उत्तम पर्याय ठरू शकेल. चला तर लगेच बनवूयात आणि ह्याची मजा लुटुयात.  

मिक्स भाज्यांचे मुटके

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. गाजर - १ (मध्यम आकाराचे) २. दुधीभोपळा- १०० ग्रॅम ३. लालभोपळा - १५० ग्रॅम ४. कोबी - १०० ग्रॅम ५. तांदळाचे पीठ - ३ टेबल स्पून किंवा ६. बेसन - ३ टेबल स्पून

मसाले : १. हळद पूड- १/२ टी स्पून २. संडे मसाला : १ टी स्पून ३. धने - जीरा पूड - १ टी स्पून ४. चाट मसाला - १/२ टी स्पून ५. मीठ - चवी प्रमाणे ६. तीळ- १ टी स्पून ७. तेल - ब्रशिंग साठी

सजावट आणि चव वाढविण्या करिता: १. खोवलेला ओला नारळ- १ टेबल स्पून २. कोथिंबीर- १ टेबल स्पून ३. मोहरी- १/२ टी स्पून ४. तीळ- १/२ टी स्पून ५. तेल- फक्त ब्रशिंग करिता

 

पध्दत :

१. साहित्या मध्ये दिलेल्या सर्व भाज्या (गाजर, कोबी, दुधीभोपळा आणि लाल भोपळा) प्रथम नीट किसून घ्या.

२. किसल्या नंतर ह्या भाज्या साधारण अंदाजे २० मिनिटांसाठी कोमट मिठाच्या पाण्या मध्ये भिजवून ठेवा.

३. २० मिनिटे झाल्यावर मिठाचे पाणी गाळून काढावे आणि ह्या भाज्या स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्याव्यात.

४. ह्या किसलेल्या भाज्या आता एका कढई मध्ये हॉट प्लेट/गॅस शेगडी/स्टोव्हचा वापर करून ५-१० मिनिटांसाठी वाफवून घ्याव्यात.

५. आता ह्या वाफवलेल्या भाज्यां मध्ये तांदळाचे पीठ किंवा बेसन घालावे व ते नीट मिक्स करावे.

६. आता ह्या मिश्रणा मध्ये वर साहित्या मध्ये दिलेले सर्व मसाले (संडे मसाला, चाट मसाला, धने-जीरे पूड, हळद पूड, तीळ आणि चवी प्रमाणे मीठ) घालावेत व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे.

७. आत हाताच्या तळव्याला २ थेम्ब तेल लावावे आणि ह्या मिश्रणा पासून साधारण आपल्या अंगठ्याच्या आकार एवढे लांबट मुटके बनवून घ्यावे.

८. आता पुन्हा हॉट प्लेट/ गॅस शेगडी/स्टोव्हचा वापर करून एका कढई मध्ये हे मुटके १० मिनिटांसाठी नीट वाफवून घ्यावेत.

९. आता आपण हे मिक्स भाज्यांचे मुटके ४ वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. जसे,

पद्धत १:

१. हे वाफवलेले मुटके असेच सुद्धा खाऊ शकता.

२. ते गरमा गरम खाणे चांगले.

पद्धत २:

१. हॉट प्लेट/गॅस शेगडी/स्टोव्ह वर एक तवा गरम करत ठेवावा.

२. ह्या तव्याला ब्रशच्या साहाय्याने २-३ थेंब तेल सर्व बाजूने नीट लावून घ्यावे.

३. ह्या वर मोहरी आणि तीळ घालावेत.

४. आता वाफवलेले मिक्स भाज्यांचे मुटके ह्या तव्यावर ठेवावेत आणि ५ मिनिटांसाठी नीट परतून घ्यावेत.

५. एकदा का ते कुरकुरीत झाले कि गॅस बंद करावा.

६. सजावटीसाठी त्यावर ओला किसलेला नारळ आणि कोथिंबीर घालावी.

७. ते गरमा गरम खावेत.

पद्धत ३:

१. हॉट प्लेट/गॅस शेगडी/स्टोव्हवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवावा.

२. तव्याला ब्रशच्या साहाय्याने २-३ थेंब तेल नीट लावून घ्यावे.

३. आता वाफवलेले मिक्स भाज्यांचे मुटके तव्यावर ठेवावेत.

४. कुरकुरीत होई पर्यत ते नीट खरपूस भाजून घ्यावेत.

५. हे गरमा गरम मुटके चटणी किंवा दह्या बरोबर खावेत.

पद्धत ४:

१. ५ मिनिटांसाठी प्रथम एअर फ्रायर गरम करावा.

२. त्या मध्ये आता वाफवलेले मिक्स भाज्यांचे मुटके १८० अंश तापमानावर १५ मिनिटांसाठी ठेवावेत.

३. हे गरमा गरम मुटके चटणी/दही किंवा सॉस (खट्टा-मीठा सॉस) बरोबर खावेत.

 

Recipe in English